कोल्हापूर पंचगंगा घाटावर निसर्गाचा अविस्मरणीय आविष्कार; किशोर घाडगे यांच्या कॅमेरात टिपली नयनरम्य संध्याकाळ!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूरचे नागरिक किशोर घाडगे यांनी काल सायंकाळी पंचगंगा घाटावर फेरफटका मारत असताना निसर्गाच्या एका अविस्मरणीय चमत्काराचे दर्शन घडले. व्यावसायिक छायाचित्रकार नसतानाही, त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपलेली सूर्यास्ताची विविध रूपे सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.
घाडगे नेहमीप्रमाणेच सायंकाळी पंचगंगा नदीच्या काठी फिरायला गेले होते. त्यावेळी पश्चिम आकाशात सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य त्यांच्या डोळ्यांना दिसले. आकाशात निळे, तांबडे, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या छटा एकाच वेळी एकत्र आल्या होत्या, ज्यामुळे एक रमणीय आणि लोभसवाणे दृश्य निर्माण झाले होते. हे दृश्य इतके विहंगम होते की, घाडगे यांनी तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये ते कैद केले.
डोळ्यांना तृप्त करणारा देखावा होता.
अशा प्रकारचे दृश्य दुर्मिळ मानले जाते आणि निसर्गात अनेक ठिकाणी ते वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. पंचगंगा घाटावर अनुभवलेला हा निसर्गाचा चमत्कार डोळ्यांना एक वेगळीच तृप्ती देणारा आणि मनाला समाधान देणारा होता, असे घाडगे यांनी सांगितले. हे दृश्य पाहताना मन पूर्णपणे शांत होऊन निसर्गाच्या सौंदर्यात रमून जाते. किशोर घाडगे यांनी टिपलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, निसर्गप्रेमींकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.