रुईकर कॉलनी टॉवर उद्यानाचा लवकरच कायापालट!

कोल्हापूर (सलीम शेख ) : रुईकर कॉलनीतील प्रसिद्ध टॉवर उद्यानाला लवकरच गतवैभव प्राप्त होणार आहे. माजी नगरसेवक सत्यजित नाना कदम यांनी या उद्यानाची पाहणी केली असून, त्याच्या नूतनीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, उद्यानाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून रुईकर कॉलनी टॉवर उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. उद्यानातील अनेक गोष्टींची मोडतोड झाली होती आणि तटबंदीही मोडकळीस आली होती. एकेकाळी हजारो नागरिकांच्या गर्दीने फुलून जाणारे हे उद्यान दुरुस्तीच्या अभावी ओस पडले होते, ज्यामुळे उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या घटली होती.
या दुरवस्थेची दखल घेत माजी नगरसेवक सत्यजित नाना कदम यांनी या उद्यानाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे रुईकर कॉलनी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सत्यजित नाना कदम यांच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत. लवकरच हे उद्यान आपल्या मूळ स्वरूपात परत येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.