गणेश चतुर्थीची लगबग, मूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात, जिल्ह्याबाहेरही विक्रीसाठी रवाना!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण असलेल्या गणेश चतुर्थीला आता काहीच दिवसांचा अवधी राहिला आहे. महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि यासाठी तरुण मंडळांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो. याच उत्साहाने भारलेल्या तरुण मंडळांचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती निवडण्यासाठी कुंभार गल्लींमध्ये गर्दी करू लागले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कुंभार गल्लींमध्ये गणपती मूर्ती घडवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेश अशा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांतील कुंभार गल्ल्यांमध्ये मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. कुंभार समाजातील कुटुंबे या दिवसांत आपला पूर्ण वेळ आणि मेहनत या मूर्तींना आकार देण्यात खर्च करत आहेत. त्यांची कलाकुसर आणि मेहनत मूर्तींमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
काही ठिकाणी तर मूर्तींचे काम पूर्ण झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातून लगतच्या राज्यांमध्येही गणेश मूर्ती विक्रीसाठी पाठवल्या जात आहेत. यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. कुंभार बांधवांची लगबग आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण गणेशोत्सवासाठी सज्ज होत आहे.