बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगा नदीत आढळला, कोल्हापुरात शोककळा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : उत्तरेश्वर पेठेतील धनवडे गल्ली येथून सोमवारपासून बेपत्ता असलेल्या अंदाजे ५० वर्षीय कल्पना महेश ओतारी यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीत राजाराम बंधाऱ्याजवळ आढळून आला आहे. या घटनेने ओतारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
कल्पना ओतारी सोमवार सकाळपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी शहरभर आणि नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला होता, मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता. आज सकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील जॅकवेलजवळून कल्पना ओतारी यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच ओतारी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.