कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लमानी समाजाचा आक्रोश मोर्चा: झोपड्या उद्ध्वस्त केल्याने तीव्र संताप!

कोल्हापूर (सलीम शेख ) : उजळाईवाडी येथील शिवपार्वती नगरातील लमानी कुटुंबांच्या झोपड्या पाडल्याच्या निषेधार्थ लमानी समाजाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. गेल्या ४० वर्षांपासून या जागेत वास्तव्यास असलेल्या लमानी बांधवांच्या झोपड्या ऐन पावसाळ्यात, कोणतीही पूर्वसूचना न देता, उजळाईवाडी ग्रामपंचायत आणि प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मानवतेला काळिमा फासणारे कृत्य असे संबोधत, लमानी समाजाने प्रशासनाच्या या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब लमानी समाजाच्या असहाय्यतेचा आणि गरिबीचा फायदा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे आंदोलकांनी म्हटले. यामुळे शेकडो लमानी कुटुंबे उघड्यावर पडली असून, आबालवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची मोठी वाताहत झाली आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे लमानी समाजाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवेदनातून शासनाला आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, लमानी बांधव हे भारताचे नागरिक असून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्यावर पडलेल्या लमानी बांधवांच्या दयनीय अवस्थेची संवेदनशीलतापूर्वक दखल घेऊन, त्यांच्या निवाऱ्यासाठी पर्यायी जागेची तात्काळ व्यवस्था करावी आणि त्यांना भोगाव्या लागत असलेल्या नरकयातना थांबवाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
जर शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन लमानी समाजाला न्याय न दिल्यास, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, भारताच्या स्वातंत्र्यदिनापासून, पाळीव प्राणी, आबालवृद्ध आणि महिलावर्गासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अल्टीमेटम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी श्रीकांत कांबळे, चंद्रकांत काळे, विकास भोसले, वेंकटेश पवार, रवी राठोड, संतोष मोरे, दिलीप सोनवणे, लक्ष्मण घोलप, अनिरुद्ध कांबळे, महेश हाळकुंदे, संदीप पाटील, अनिल चव्हाण, पांडुरंग राठोड, सुरेश मोहीत, सचिन कांबळे, बबलू शंकर चौगुले, गायकवाड, सुरज कांबळे, मोहन राठोड यांच्यासह लमानी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.