कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष दर्जा मिळण्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला (Kolhapur Urban Area Development Authority – KUADA) विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याबाबत पुढील दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले. कोल्हापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केलेल्या उपोषणाला आमदार चंद्रदीप नरके यांनी पाठिंबा दिला होता, तसेच खासदार धनंजय महाडिक आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी या मागणीला दुजोरा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत सातत्याने पाठपुरावा केला होता.
यापूर्वी राजू माने यांनी कोल्हापूर दसरा चौक येथे KUADA ला विशेष प्राधान्य मिळावे यासाठी उपोषण केले होते. या उपोषणाला आमदार चंद्रदीप नरके, खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला होता. आमदार नरके यांनी याच मागणीचा पाठपुरावा विधानसभेत केला होता.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, कोल्हापूर शहरालगत असलेल्या ४२ गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या KUADA मध्ये करवीर तालुक्यातील ३७ गावे आणि हातकणंगले तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजना मंजूर असून, या योजनेतील तरतुदीनुसार विकास परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र, जर विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करून या ४२ गावांचा सर्वांगीण विकास होणार असेल, तर येत्या दोन महिन्यांत त्याबाबत माहिती मागवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनी KUADA च्या मुदतवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, त्याऐवजी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. उद्योगमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा निर्णय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.