कोल्हापुरात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली. माळकर तिकटी ते बिंदू चौक आणि अजिंक्यतारा चौक ते आरटीओ ऑफिस मेन रोडवरील विनापरवाना लावण्यात आलेल्या ९ पत्र्याच्या शेड, २ केबिन आणि १२ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे, कारवाईची माहिती मिळताच १० हातगाड्या त्यांच्या मालकांनी स्वतःहून काढून घेतल्या.
ही कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सज्जन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे यांच्यासह अतिक्रमण, राजारामपुरी आणि गांधी मैदान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली.
महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, यापुढेही शहरात अनधिकृत फेरीवाले आणि दुकानांबाहेर लावलेल्या अनधिकृत शेडवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे, दुकान मालक आणि फेरीवाल्यांनी स्वतःहून आपली अनधिकृत अतिक्रमणे काढून टाकावीत. तसेच, दुकानांबाहेर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात येणारे स्टँड बोर्ड लावू नयेत, अन्यथा ते जप्त करण्यात येतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.