आपला दवाखाना’ योजनेचा विस्तार होणार: मुंबईत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची आढावा बैठक संपन्न!

कोल्हापूर (सलीम शेख ) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर, आज आरोग्य भवन येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मुंबई पार पडली. या बैठकीत रुग्णांना अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण सेवा आणि औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी विविध सूचना करण्यात आल्या.
“गरज भासल्यास नव्या दवाखान्यांची स्थापना करणे आणि सध्या कार्यरत असलेल्या दवाखान्यांतील सेवा व चाचण्या वाढवणे आवश्यक आहे,” असे निर्देश यावेळी देण्यात आले. सध्या ‘आपला दवाखाना’ मध्ये ३० प्रकारच्या मोफत तपासण्या आणि १०५ प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सेवा अद्ययावत ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमितपणे फील्ड व्हिजिट्स कराव्यात, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आवर्जून सांगितले.
शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि जागेच्या मर्यादेवर तोडगा काढण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी कंटेनरमध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचा पर्याय मांडला. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, गरजेनुसार हा मार्ग स्वीकारण्याबाबत विचार सुरू आहे.
तसेच, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास तातडीने पदभरती करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.
शहरी भागातील सामान्य नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा सहज मिळावी, हाच या योजनेचा मूळ उद्देश असून, त्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त संचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, संचालक (शहरी) डॉ. स्वप्नील लाळे, सहाय्यक संचालक डॉ. दीप्ती पाटील तसेच इतर आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.