शिवाजी विद्यापीठाच्या कारभारावर शिवाजीराव परुळेकरांचा संताप: सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब करणाऱ्यांना शिक्षा कधी?

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क आकारले जाते आणि गैरवर्तन केल्यास शिक्षाही केली जाते. मग, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि देयके देण्यास विलंब करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल माजी सैनिकांचे प्रतिनिधी शिवाजीराव परुळेकर यांनी शिवाजी विद्यापीठासमोरील आंदोलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी परुळेकर यांनी विद्यापीठाच्या दुटप्पी धोरणावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जातो, मग प्रशासकीय स्तरावर दिरंगाई करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का नाही? सुरक्षा रक्षकांचे सातवा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रकमा देण्यास झालेल्या विलंबासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करून त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे.”
यावेळी माजी सैनिक धनवडे आणि मारुती पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आमच्या फरकाच्या रकमांचा प्रस्ताव सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाकडे यापूर्वीच पाठवला असल्याची खोटी माहिती विद्यापीठाने दिली होती. प्रत्यक्षात, आंदोलन सुरू झाल्यावर आणि आंदोलनात फूट पाडण्याच्या उद्देशाने, केवळ १५ पैकी दोन-तीन लोकांचे अपुरे प्रस्ताव आजच पाठवण्यात आले. याबाबत सहसंचालक कार्यालयानेही स्पष्ट खुलासा केला आहे.”
या विलंबामुळे आपल्याला बँक, पतसंस्था आणि खाजगी सावकारांकडून कर्ज काढून व्याज भरावे लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, थकीत रकमांवरील १२% दराने व्याज जबाबदार संबंधितांकडून वसूल करून ते आम्हाला मिळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, आंदोलनातील सर्व कर्मचाऱ्यांचे विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडे पाठवून, त्याची प्रत मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिकाही आंदोलनकर्त्यांनी घेतली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मस्के व संजय माने यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
दलित मित्र शिवाजीराव परुळेकर यांनी याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.