बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात भव्य आक्रोश मोर्चा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने आज, सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी, बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो बांधकाम कामगार या मोर्चात सहभागी झाले होते, त्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करत दसरा चौक परिसर दणाणून सोडला.
सकाळी १० वाजता दसरा चौकातून निघालेला हा आक्रोश मोर्चा व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये बांधकाम कामगारांना दोन मुलींच्या विवाहाचा लाभ मिळावा, ही मागणी अग्रस्थानी होती. यासोबतच, कामगारांना मिळणाऱ्या इतर योजनांचा लाभ वेळेत मिळावा, नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, आरोग्य आणि शिक्षणविषयक सुविधा पुरवाव्यात अशा अनेक मागण्या यावेळी रेटण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर, कृती समितीच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अधिकाऱ्यांसोबत या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी कामगारांनी व्यक्त केला.
या मोर्चामुळे बांधकाम कामगारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात यश आले असून, त्यांच्या न्याय हक्कांसाठीचा हा लढा यापुढेही सुरूच राहील, असे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.