मोठी कारवाई! कोल्हापूर पोलिसांकडून २ किलो २४० ग्रॅम गांजा जप्त, दोन आरोपी जेरबंद!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या ‘मिशन झिरो ड्रग्ज’ मोहिमेंतर्गत कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शहापूर-इचलकरंजी परिसरातून २ किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ५६,००० रुपये आहे.
पोलिसांची धडक करण्यात आली यामध्ये
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अंमली पदार्थांच्या तस्करांवर पाळत ठेवली होती.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तारदाळ येथून दोन व्यक्ती मोटरसायकलवरून कोरोची येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याजवळ गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांना कारवाईचे आदेश दिले.
सापळा रचून आरोपींना पकडले
शीतलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ कोरोची येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्याजवळ सापळा रचला. यावेळी त्यांनी दोन संशयित व्यक्तींना त्यांच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे १) अरबाज नजीर चौधरी (वय २२, रा. आझाद नगर, गल्ली नं. ४, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि २) नियाज मोहद्दीन मुल्ला (वय २२, रा. बिलाल मशीदजवळ, आझाद नगर, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी सांगितली.
दोन शासकीय पंचांसमोर त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात ५६,००० रुपये किमतीचा २ किलो २४० ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीसाठी वापरलेले इतर साहित्य असा एकूण १,८१,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरु,
अटक करण्यात आलेल्या अरबाज नजीर चौधरी आणि नियाज मोहद्दीन मुल्ला या दोन्ही आरोपींविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार आणि मा. अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार प्रदीप पाटील, वैभव जाधव, वैभव पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, योगेश गोसावी, गजानन गुरव, अरविंद पाटील, अशोक पोवार, सुशील पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.
या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असे पोलिसांनी सांगितले आहे.