कोल्हापूर शहरातची हद्दवाढ तातडीने व्हावी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहराची हद्दवाढ तातडीने व्हावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कोल्हापूर शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, मंडळे, संस्था, फेरीवाले, भाजी विक्रेते आणि अन्य संघटनांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आपली उपस्थिती दर्शवली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रणित विविध संघटनांनीही आपला सक्रिय पाठिंबा व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी हद्दवाढीसंदर्भात मनसेची भूमिका सविस्तरपणे मांडली.
या लाक्षणिक उपोषणादरम्यान, हद्दवाढीमुळे शहराचा नियोजनबद्ध विकास कसा साधता येईल, पायाभूत सुविधा कशा सुधारतील आणि परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या सोयीसुविधांचा लाभ कसा मिळेल, यावर भर देण्यात आला. उपोषणात सहभागी झालेल्या सर्व घटकांनी शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने हद्दवाढीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.