कसबा सांगाव येथे विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मदतीचे वाटप; आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न!

कसबा सांगाव (सलीम शेख ) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आज कसबा सांगाव येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील कर्ज प्रकरणांची मंजुरी, तसेच बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, “सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या मदतीने महिलांना सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ हे मोठे पाऊल आहे.” बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडासा आधार मिळावा, हाच शासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी कर्ज प्रकरणे मंजूर झाली. तसेच बांधकाम कामगारांना मिळालेल्या संसारोपयोगी साहित्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आधार मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित लाभार्थ्यांनी सरकारच्या या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), गटनेते राजेंद्र माने (सर), किरण पास्ते, विठ्ठल चव्हाण, संभाजी कोकाटे, माजी सरपंच रणजीत कांबळे, नेमिनाथ चौगुले, उमेश माळी, अविनाश मगदूम, मोहन आवळे, सागर माळी, दीपक गंगाई यांच्यासह अनेक लाभार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.