कुंभी-कासारी साखर कारखान्याला ‘उच्च साखर उतारा’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार; ऊस तोडणी वाहतूक संघटनेकडून सत्कार!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने हंगाम २०२३-२४ करिता “उच्च साखर उतारा” श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. कारखान्याच्या या यशाबद्दल ऊस तोडणी वाहतूक संघटनेमार्फत कारखान्याचे चेअरमन यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने केलेला सत्कार विनम्रपणे स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी “कारखान्याला मिळालेल्या या यशात ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा देखील मोठा वाटा आहे,” अशी कृतज्ञता व्यक्त केली. कारखान्याच्या प्रगतीत ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या कामगारांचे योगदान अनमोल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सत्कार समारंभास कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याच्या या यशाने परिसरातील शेतकरी आणि कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यक्षमतेचे आणि ऊस उत्पादक तसेच कामगारांच्या परिश्रमाचे प्रतीक मानला जात आहे.