कुंभोज गावाच्या बदनामीबद्दल खुलासा: पोलीस निरीक्षकांनी दिली सारवासारव!

कुंभोज (सलीम शेख ) : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावाच्या हद्दीत कुंटणखाना असल्याच्या काही वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात या घटनेचा आणि कुंभोजच्या हद्दीचा काहीही संबंध नसून, पोलीस प्रशासनाकडून झालेल्या चुकीमुळे हे घडल्याचे समोर आले आहे. हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी या प्रकरणी खुलासा करत, चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी अनेक दैनिकांनी कुंभोज येथे कुंटणखान्यावर छापा टाकल्याची बातमी फोटोसहित प्रसिद्ध केली होती. यामुळे जिल्ह्यात कुंभोज गावाची नाहक बदनामी झाल्याची चर्चा सुरू झाली. वस्तुस्थिती अशी असतानाही, पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमुळे चुकीची माहिती छापून आल्याने गावातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती.
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी, कुंभोज ग्रामपंचायतचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील, सदाशिव महापूरे, छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर, पत्रकार विनोद शिंगे, सचिन भानुसे, सचिन लोंढे, शकील सुतार, वसंत कांदेकर, यौवन घाटगे, सागर सुवासे, सुरेश भगत, विनायक पोद्दार, विश्वजीत माने यांच्यासह कुंभोज परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना निवेदन दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सदर घटनेची तपासणी रात्रीच्या वेळी झाल्याने, प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या ठिकाणाच्या माहितीवरून सदर माहिती देण्यात आली होती. तसेच, सदर भागाची काही अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने गावाचे नाव चुकीने दिले गेले असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कुंटणखाना चालत नसल्याचाही खुलासा केला.
पोलिसांच्या या खुलासामुळे कुंभोज गावावरील बदनामीचा डाग पुसला गेला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.