मुरगूडमधून बेपत्ता ५८ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आढळला!

मुरगूड ता. कागल (सलीम शेख ): मुरगूड येथील श्रीराम मंगल कार्यालयातून २ जुलै २०२५ रोजी बेपत्ता झालेल्या बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८ , रा. सोनगे, ता. कागल) यांचा मृतदेह आज, ८ जुलै रोजी सकाळी मंगल कार्यालयाच्या जवळील शेतात आढळून आला आहे. गवत साफसफाई करत असताना शेजाऱ्यांना हा मृतदेह दिसला.
बाळासो लोंढे हे श्रीराम मंगल कार्यालयात एका लग्नसमारंभासाठी आले होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यांचा मुलगा अमोल बाळासो लोंढे (वय ३४, धंदा-फेब्रिकेशन, रा. सोनगे) यांनी आजूबाजूला, पै-पाहुणे आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. त्यानंतर त्यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, हॉल जवळील शेजाऱ्यांनी गवत साफसफाईचे काम करत असताना त्यांना एक मृतदेह आढळला. हा मृतदेह सोनगे येथील बेपत्ता शेतकरी बाळासो लोंढे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. ओळख पटल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.