नेर्ली, करवीर येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल!

नेर्ली (इरफान मुल्ला) : करवीर तालुक्यातील नेर्ली येथील शेतकरी मारुती पाटील हे ६८ वयात शेतीची मशागत करत आहेत. यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात लावलेली भुईमूग शेंग आणि भाजीपाला पिके पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मारुती पाटील यांनी आपल्या शेतात भुईमूग शेंग पेरली होती, तर त्यांच्या शेजारील शेतात कोबीची फळभाजी लावण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोबीचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे, ज्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.पिके वाया गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार असून, त्यांच्यापुढील अडचणी अधिक वाढणार आहेत.
या नैसर्गिक आपत्तीमुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने, पुढील काळात बाजारात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर मोठे संकट आले असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.