कोल्हापूरच्या कोंबडी बाजारात गटारींच्या समस्येने व्यापारी हैराण; तातडीच्या उपायांची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कोंबडी बाजार परिसरात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दुरुस्त न झालेल्या गटारांमुळे व्यापारी आणि नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. रस्त्याखालील गटारींमध्ये कचरा साचल्याने आणि पाण्याचा निचरा न झाल्याने त्या तुंबल्या आहेत, तर काही ठिकाणी गटारींचे चेंबर्स पूर्णपणे बुजून गेले आहेत.
गेल्या २० दिवसांपासून या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटारींमधून काढण्यात आलेला कचरा रस्त्याच्या कडेला खड्डे करून ठेवल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे दुकानदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. काही दुकानांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले आहे. परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे गिऱ्हाईकांनी या बाजाराकडे पाठ फिरवली आहे, ज्यामुळे दुकानदारांचे उत्पन्न घटले आहे.
कोंबडी बाजारातील दुकानदारांनी आणि परिसरातील नागरिकांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे. ही गटारे पूर्णपणे साफ करून त्यांची दुरुस्ती करणे आणि पाण्याचा योग्य निचरा होईल याची खात्री करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.