महाराष्ट्र ग्रामीण

पाटपन्हाळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या फस्त; वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन!

पाटपन्हाळा (सलीम शेख ): राधानगरी वनपरिमंडळांतर्गत येणाऱ्या पाटपन्हाळा गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या पाच शेळ्या ठार झाल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराबाबत ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, अर्धवट खाल्लेल्या शेळ्यांच्या अवशेषांजवळ बिबट्या मादी आणि तिच्या एका बछड्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. यामुळे या हल्ल्यात बिबट्याचे बछडेही सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिबट्याचा वाढता वावर आणि वनविभागाची चिंता
सध्या राधानगरी, फेजिवडे, बनाचीवाडी, पाटपन्हाळा, भांडणे आणि रामणवाडी या गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वनविभागाने म्हटले आहे. ही गावे राधानगरी अभयारण्याच्या सीमेलगत असल्याने वन्यप्राणी, विशेषतः बिबटे, मानवी वस्तीत येण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने ग्रामस्थांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वन्यप्राण्यांपासून स्वतःचे आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत:
रात्री घराबाहेर पडताना टॉर्च, मोबाईलचा टॉर्च किंवा घुंगराची काठी सोबत ठेवावी.
शक्य असल्यास रेडिओवर गाणी लावावीत, जेणेकरून बिबट्याला मनुष्याच्या उपस्थितीची जाणीव होईल आणि तो दूर राहील.
उन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर अंगणात झोपणे टाळावे. शक्य असल्यास अंगणाभोवती जाळी किंवा तारेचे कुंपण घालावे.
उघड्यावर शौचास जाणे टाळावे आणि बंदिस्त शौचालयाचा वापर करावा.
लहान मुले आणि पाळीव प्राणी यांना एकटे बाहेर सोडू नये.
ऊसशेतीतील अंतर: ऊसशेती करताना घर आणि ऊसाच्या फडामध्ये किमान २० ते २५ फूट अंतर ठेवावे.
वन्यप्राण्यांची हालचाल ही नैसर्गिक बाब असली तरी, आपली आणि पशुधनाची सुरक्षितता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित वनविभाग किंवा ग्रामपंचायतीस माहिती देण्याचे आवाहन सरपंच आणि वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button