राज गॅंग’ टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार!

पेठवडगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई सुरूच आहे. या मोहिमेअंतर्गत पेठवडगाव परिसरातील कुख्यात ‘राज गॅंग’ या संघटित गुन्हेगारी टोळीला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारी समूळ उच्चाटनाचा निर्धार
जिल्ह्यातून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) आणि हद्दपारीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पेठवडगाव, हातकणंगले तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अवैध गुन्हेगारी कारवायांनी सर्वसामान्य जनतेचे जीवन धोक्यात आणणाऱ्या ‘राज गॅंग’ विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता.
हद्दपार करण्यात आलेल्या टोळीचे सदस्य
‘राज गॅंग’चा प्रमुख राजवर्धन बाबासो पाटील (वय ३६, रा. कोल्हापूर नाका, वडगाव) याच्यासह खालील १९ सदस्यांना हद्दपार करण्यात आले आहे:
१. राजवर्धन बाबासो पाटील (वय ३६, रा. कोल्हापूर नाका, वडगाव)
२. रोहित बाळासो पाटील (वय २०, रा. वडगाव)
३. विशाल दिलीप जाधव (लाल्या) (वय ३५, रा. इंदिरा वसाहत, पेठवडगाव)
४. राहुल सुरेश लोहार (वय ४०, रा. ठाणेकर चौक, वडगाव)
५. ओंकार सुरेश लोहार (वय २६, रा. ठाणेकर चौक, वडगाव)
६. राकेश नामदेव हाके (वय २६, रा. माळी गल्ली, वडगाव)
७. अक्षय नवनाथ हाके (वय २६, रा. माळी गल्ली, वडगाव)
८. शुभम संजय शिंदे (वय १९, रा. शिवाजी चौक, वडगाव)
९. प्रवीण उर्फ पप्या संभाजी माने (वय ३१, रा. सुतारगल्ली)
१०. तेजस दिलीप जाधव (वय २६, रा. माळी गल्ली, वडगाव)
११. प्रभाकर गोविंद कुरणे (वय ५०, रा. मौजे तामगाव)
१२. अजित तानाजी सावंत (विनू) (वय २५, रा. वडगाव)
१३. विकास भगवान अवघडे (वय ४०, रा. भादोले)
१४. शुभम दत्तात्रय यादव (वय २५, रा. पेठवडगाव)
१५. मंथन उर्फ छोट्या उमेश सराटे (वय २७, रा. वडगाव)
१६. रोहित सुरेश जाधव (वय २९, रा. वडगाव)
१७. दीपक संपत भोसले (वय ३१, रा. शिवाजी चौक, वडगाव)
१८. महेश गणपती डेळेकर (वय २५, रा. वडगाव)
१९. प्रसाद उर्फ लाल्या संतोष सुतार (वय २८, रा. सावकार चौक, वडगाव)
न्यायप्रविष्ट चौकशी आणि सुनावणी
या प्रस्तावावर निष्पक्ष चौकशीसाठी गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी चौकशीअंती आपला अहवाल पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना सादर केला. चौकशीदरम्यान आणि त्यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये टोळीप्रमुख आणि सदस्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली. सुनावणीमध्ये ‘राज गॅंग’ने अवैध कृत्यांद्वारे समाजात दहशत निर्माण करून सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण केल्याचे स्पष्ट झाले.
एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश
सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरिकांचे जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण हे सर्वहित लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २५ जून २०२५ रोजी या टोळीच्या प्रमुखासह १९ जणांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.
वडगाव पोलिसांनी यापैकी ८ जणांना आदेशाची बजावणी केली असून, उर्वरित १३ जणांना आदेश बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हद्दपार करण्यात आलेले १ ते १९ इसम कोल्हापूर जिल्ह्यात कोठेही दिसल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. आपल्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे ही विनंती.