पट्टणकोडोली पाणीपुरवठा केंद्रावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

पट्टणकोडोली (सलीम शेख ) : सुमारे ३५ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करणाऱ्या पट्टणकोडोली येथील पाणीपुरवठा केंद्राचा परिसर सध्या घाणीच्या साम्राज्यामुळे कोंडाळा बनला आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणीपुरवठा केंद्राच्या आजूबाजूला ग्रामस्थांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात काही खाजगी वाहने अनधिकृतपणे पार्क केलेली आढळतात, तर काही लोकांनी चक्क आपल्या घरातील टाकाऊ वस्तू आणि साहित्य या पवित्र ठिकाणी रचून ठेवले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या अनास्थेमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे तातडीने या परिसराची स्वच्छता करण्याची आणि स्वच्छतेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा पट्टणकोडोलीतील नागरिक करत आहेत.