पन्हाळा येथील घरफोडीतील १.४0 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत!

पन्हाळा (सलीम शेख ) : पन्हाळा पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत, चोरट्यास अटक करून सुमारे १.४0 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने केली असून, त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश शशिकांत तोरसे (वय ४३, रा. सातावे, ता. पन्हाळा) यांच्या घरात १० जून ते २० जुलै २०२५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे नेकलेस आणि कर्णफुले चोरून नेले होते. या चोरीमध्ये एकूण १,४0,000 रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पार्थ हिंदुराव नाळे (वय १९, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) या संशयिताला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु, पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या कौशल्यापूर्ण चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा नेकलेस आणि कर्णफुले असा संपूर्ण १,४0,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार सी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शाहूवाडी) आप्यामो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, पो. उपनिरीक्षक महेश कोंडर्भरी, सहाय्यक फौजदार मारुती नाईक, पो. हवा. संतोष वायदंडे, पो.ना. तौसिफ मुल्ला आणि पो.शि. प्रविण बोरचाटे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मारुती नाईक करत आहेत.