राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; भोगावती नदीत ७२१२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग!

राधानगरी (सलीम शेख ) : राधानगरी धरण परिसरात संततधार पावसामुळे धरण १००% भरले असून, शुक्रवारी रात्रीपासून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. राधानगरी जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजून ३ मिनिटांनी दोन दरवाजे, रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी ५ नंबरचा दरवाजा, तर पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी ४ नंबरचा दरवाजा उघडण्यात आला.
धरण परिसरात गेल्या २४ तासांत १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या चारही स्वयंचलित दरवाजांमधून ५७१२ क्यूसेक आणि बीओटी पॉवरमधून १५०० क्यूसेक असा एकूण ७२१२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सोडण्यात येत आहे.
गेल्या वर्षी २४ जुलै २०२४ रोजी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले होते. सध्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने राधानगरी जलसंपदा विभागाने नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.