सांगली हादरले: कुपवाडमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून!

सांगली (सलीम शेख ) : सांगली जिल्ह्यात खुनाच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मिरज तालुक्यातील कुपवाड येथील रामकृष्ण नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वामी समर्थ मंदिराशेजारी अमोल रावसाहेब रायते (वय ३२) या युवकाचा काल रात्री अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला. त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अमोल रायतेचा मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
या घटनेमुळे कुपवाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे