सरनोबतवाडी येथील विद्यार्थिनीची आत्महत्या; आई-वडिलांनी शाळेबद्दल विचारल्याने उचलले टोकाचे पाऊल!

गांधीनगर (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील १३ वर्षीय अर्पिता विवेक देसाई हिने शुक्रवारी (१८ जुलै) शाळेला न जाण्यावरून आई-वडिलांनी विचारणा केल्याच्या रागातून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अर्पिता कोल्हापुरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. गुरुवारी (१७ जुलै) ती शाळेत गैरहजर असल्याची माहिती शाळेतून तिच्या पालकांना देण्यात आली. यावरून आई-वडिलांनी तिला विचारणा केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून, अर्पिताच्या आई-वडील बाहेर गेले असताना तिने राहत्या घरातील लोखंडी तुळईला साडीने गळफास घेतला.
नातेवाईकांनी अर्पिताला तात्काळ बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. विकी एकनाथ साळोखे (३२, रा. वळिवडे) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.