कोल्हापुरात बोगस पत्रकारितेचा पर्दाफाश: ‘डेटा स्कॅम’मुळे विश्वासार्हतेला तडा!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापुरात पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. खंडणी मागण्यांबरोबरच आता वेब चॅनेलच्या नावाखाली ‘डेटा स्कॅम’चा (Data Scam) नवा प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे पत्रकारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेला सध्या ग्रहण लागल्याचे चित्र आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्याच्या, कोणतीही विश्वासार्हता न जपण्याची आणि केवळ व्ह्यूज व पैशांसाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे.
डोळ्यासमोर न दिसणारा ‘डेटा स्कॅम’
काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात तोतया पत्रकार, बोगस पत्रकार आणि खंडणीखोर पत्रकार अशा अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र, त्याहूनही गंभीर असा एक प्रकार सध्या कोल्हापुरात सुरू आहे – तो म्हणजे ‘डेटा स्कॅम’. एका चॅनेलचा महत्त्वाचा डेटा दुसऱ्या चॅनेलला किंवा अनेक चॅनेलना पुरवून आपली कमाई वाढवण्याचा हा गैरप्रकार वेब न्यूजच्या माध्यमातून सुरू आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महिला, कॅमेरामन आणि व्हिडिओ एडिटर यांचा समावेश असलेल्या टोळ्या सक्रिय आहेत. ही सत्य घटना ‘ती’च्या अमृततुल्य बातम्या या विशेष भागातून समोर आणली जात आहे.
‘ती’च्या अमृततुल्य बातम्या: एक धक्कादायक सत्य
पत्रकारिता हे क्षेत्र विश्वासार्हतेवर टिकून आहे. कोल्हापूर शहरातील वृत्तपत्रे, न्यूज चॅनल्स आणि मोजके वेब चॅनल्स आपली विश्वासार्हता जपून बातमीच्या मुळापर्यंत जाऊन सत्य घटना समाजासमोर मांडतात. पण या विश्वासाला तडा देणारी एक टोळी सध्या कोल्हापुरात कार्यरत झाली आहे. परराज्यातून पत्रकारितेत सुवर्णपदक मिळवून आलेली एक तरुणी कोल्हापुरात एका नामांकित संस्थेत काम सुरू करते. कमी मानधनामुळे तिच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. लवकर प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या नादात तिचा कल मग मार्ग कोणताही असो, याकडे वळतो.
येथूनच तिची कॅमेरामन आणि व्हिडिओ एडिटर यांच्याशी ओळख होते आणि खरा खेळ सुरू होतो. पत्रकारितेत, एखाद्या पत्रकाराला कार्यक्रमाला जाता आले नाही तर दुसरा त्याला सहकार्य करतो. याच गरजेचा गैरफायदा घेत तिने एका संस्थेच्या बातम्या दुसऱ्या संस्थेला देण्याचे काम सुरू केले. प्रत्येक छोट्या कार्यक्रमांना, निवेदनांना आणि आंदोलनांना जाऊन बातम्या घ्यायच्या. त्यामध्ये किरकोळ बदल करून कॅमेरामन आणि व्हिडिओ एडिटर यांना विश्वासात घेऊन त्या बातमीसंबंधित व्हिडिओ आणि फोटो टेलिग्राम व व्हॉट्सॲपद्वारे मिळवून आपल्या संस्थेबरोबरच इतर संस्थांनाही पुरवण्याचे काम ही टोळी अनेक वर्षांपासून करत आहे.
भारतीय न्यायव्यवस्था अधिनियम १९५७ नुसार, एका संस्थेची माहिती दुसऱ्या संस्थेला पुरवणे ही संस्थेसोबत केलेली फसवणूक ठरते. तसेच, यामुळे समाजात माध्यमांमार्फत अविश्वासाचा प्रसार करण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. या टोळीविरोधात लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरचे श्रमिक पत्रकार या गंभीर प्रकाराकडे निश्चितच दुर्लक्ष करणार नाहीत.
पुढील माहितीसाठी, ‘ती’च्या अमृततुल्य बातम्यांचा पुढील भाग पाहत रहा!