शाहूपुरी पोलिसांकडून ५९ लाखांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद; ३ आलिशान गाड्या जप्त!

शाहूपुरी (सलीम शेख ) : चारचाकी वाहने विक्री करून देण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५९ लाख ७० हजार रुपये किमतीच्या तीन आलिशान मोटारी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे.
टेंबलाईवाडी येथील रहिवासी सागर देसाई यांच्या फिर्यादीनुसार, एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत संजय हवालदार, निलेश सुर्वे, हसन जहागीरदार आणि त्यांच्या काही साथीदारांनी देसाई यांच्या मालकीच्या तीन आलिशान मोटारी विकून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, त्यांनी परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून या गाड्यांची विक्री करत देसाई यांची ५९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी निलेश सुर्वे, मोहम्मद कुरेशी, सकिब शेख, शहजामा खान आणि शेख असिफ यांना अटक केली आहे. या टोळीतील आणखी एक संशयित आरोपी हसन जहागीरदार सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या फसवणूक करणाऱ्या टोळीकडून ५९ लाख ७० हजार रुपये किमतीच्या तीन आलिशान मोटारी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे.