सिद्धार्थनगर, कोल्हापूर येथे १२२ वा राष्ट्रीय आरक्षण दिन उत्साहात साजरा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : सिद्धार्थनगर, कोल्हापूर येथील बानकर परिवाराच्या वतीने आज १२२ वा राष्ट्रीय आरक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाने दिलेल्या शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व आरक्षण लाभार्थ्यांना बानकर परिवाराने यावेळी हार्दिक मंगलकामना दिल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बानकर परिवारच्या धम्मालय येथे कुटुंबस्तरावर हा उत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आधुनिक भारतात सर्वप्रथम २६ जुलै १९०२ रोजी आपल्या करवीर संस्थानात मराठा, ओबीसी, एसबीसीसह अन्य मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण लागू केले होते. स्वतंत्र भारताच्या संविधानातून आज जरी तीन प्रकारचे आरक्षण मिळत असले तरी, आरक्षणाची पायाभरणी राजर्षी शाहू महाराजांनीच केली, असे मत बानकर परिवाराने व्यक्त केले. यामुळे प्रत्येक आरक्षण लाभार्थ्याने २६ जुलै हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे, या विचाराने बानकर परिवार गेली दहा वर्षे हा उत्सव घरी साजरा करत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी अंजना बानकर यांच्या हस्ते पुष्प आणि दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी बुद्ध मूर्ती आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून सामूहिक पंचांग प्रणाम, त्रिसरण पंचशील वंदना ग्रहण करण्यात आली. महामानवांनी मिळवून दिलेल्या आरक्षणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आम्रपाली महिला मंचच्या अध्यक्षा पूनम बानकर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “आज आमच्या घरातील कोणीही आरक्षणाचा लाभ घेऊन कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीत नाही अथवा आरक्षणाच्या राखीव जागेवर एकदाही पदावर निवडून आलेला नाही. तरीही आरक्षण टिकले पाहिजे, कारण आरक्षण राहिले तरच बहुजनांचा उद्धार होणार आहे. अन्यथा त्यांना देव नावाच्या दगडावर डोके आपटले तरीही महामानवांनी संघर्ष करून जे मिळवून दिले आहे ते मिळणार नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “आरक्षणाचा लाभ घेऊन सरकारी नोकरीत असणाऱ्यांनी, सरकारी पेन्शन घेणाऱ्यांनी, तसेच आजी व माजी लोकप्रतिनिधींनी आज आपण कुणामुळे स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत, आर्थिक प्रगती केली आहे किंवा करत आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे, अन्यथा त्यांच्यासारखे महागद्दार दुसरे कोणी नसेल.”
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरक्षणाचे महत्त्व आणि त्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देण्यात आली.