प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 आरोपीवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी भाजप पदाधिकारी!

सोलापूर (न्यूज नेटवर्क): संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवधर्म संघटनेचे आणि भाजप पदाधिकारी इंदापुरातील दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर बबन शिरगिरे राहणार इंदापूर आणि कृष्णा क्षिरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी राहणार बारामती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या ६ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. बी एन एस. कलम 115(2), 189(2),191(2),190, 324(4) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जमाव जमवून मारहाण करणे, गाडीची काच फोडणे आणि शाई फेक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल दाखल आहे. यात एकूण 2 आरोपी अटकेत असून उर्वरित 5 आरोपीचा शोध सुरू असल्याची पोलिसांची माहिती आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक येथील प्रियदर्शनी हॉल येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांचे संयुक्त विद्यमानाने जन्मेजय राजे भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमाकरीता यातील फिर्यादी सोबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुणे प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून उतरुन हॉलकडे पायी चालत जात असताना त्यांच्यावर काळे वंगण फासत हल्ला करण्यात आला. संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरुन शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटेसह त्यांच्या इतर 6 समर्थकांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन प्रविण गायकवाड व फिर्यादीचे अंगावर शाई वंगण टाकुन छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या. तसेच, यावेळी सर्वांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण केली, इनोव्हा गाडीच्या समोरच्या काचेवर दाड मारून नुकसान केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी, सपोनि बागाव हे अधिक तपास करत आहेत.
कोण आहे दीपक काटे;
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती असून दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. तर भाजपचा गमजा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे, दीपक काटे याच्यावर काही दिवसांवर पुणे विमानतळ येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.