तावडे हॉटेल चौकात वाहतूक सिग्नल कार्यान्वित: कोंडीतून दिलासा, अपघात कमी होणार!

कोल्हापूर (सलीम शेख ) : गांधीनगर परिसरातील वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या तावडे हॉटेल चौकात आजपासून (२१ जुलै २०२५) वाहतूक सिग्नल कार्यान्वित करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे या भागातील नेहमीची वाहतूक कोंडी आता टळणार असून, नागरिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गांधीनगर हे कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे, जिथे स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि मोठ्या संख्येने ये-जा करणारे पर्यटक यांची वर्दळ असते. यामुळे या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असे. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने तावडे हॉटेल चौकात हा सिग्नल बसवण्यात आला आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी ७० सेकंदांचा सिग्नल वेळ निश्चित करण्यात आला आहे, तर शहरातून गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी ४० सेकंदांचा सिग्नल वेळ ठेवण्यात आला आहे. हा सिग्नल दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्यरत राहील.
आज दिवसभरात सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर चौकातील वाहतूक अत्यंत सुरळीत आणि शिस्तबद्ध दिसून आली. त्यामुळे नागरिकांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या सिग्नलमुळे वाहतुकीचा खोळंबा तर टळणार आहेच, शिवाय अपघातांचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी होतील.