अल्पवयीन मुलांकडून परप्रांतीय तरुणांना मारहाण करून लुटले; उजळाईवाडी येथील घटना, चौघे ताब्यात!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : उजळाईवाडी (ता. करवीर) येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गॅस टाकी घेऊन घरी परतणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांना चार अल्पवयीन मुलांनी अडवून मारहाण करत मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रवी भारतसिंह मोरे (वय १९, रा. विमानतळ रोड, साळोखेनगर, उजळाईवाडी, मूळगाव बागबार खांदरा, ता. झिरन्या, मध्य प्रदेश) या तरुणाने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रवी मोरे आणि त्याचा मित्र अमरेश तेरसिंग वास्कले (सध्या रा. उजळाईवाडी) हे गॅस टाकी दुरुस्त करून मणेर मळा येथून उजळाईवाडी येथील आपल्या खोलीकडे परत येत होते. यावेळी माळरानावर बसलेल्या चार अल्पवयीन आरोपींनी त्यांना अडवले आणि ‘तुमच्याकडे जे असेल ते द्या’ अशी मागणी केली. फिर्यादी व त्यांच्या मित्राने या मागणीला विरोध करताच, आरोपींनी त्यांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रवी मोरे आणि अमरेश वास्कले हे दोघे गंभीर जखमी झाले.
हल्लेखोरांनी जखमी तरुणांच्या खिशातून रोख रकमेसह एकूण साडेनऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून, या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.