वळिवडेत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; चार जण जखमी, गावात भीतीचे वातावरण!

वळिवडे (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर रूप धारण करत असतानाच, वळिवडे गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालून चार जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास वळिवडे येथील बेघर वसाहत आणि गणेश कॉलनीनजीक एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तुषार गाडे, किशोर कुसाळे, रुद्र पोवार आणि शुभम देवकुळे या चार नागरिकांना चावा घेतला. जखमींना तातडीने गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून वळिवडे गावात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गावातील प्रमुख रस्त्यांवर ही कुत्री समूहाने फिरताना दिसतात. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवरही ही कुत्री धावून जात असल्याने अनेक अपघात घडले आहेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्या तरी, पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी इतक्या लोकांना चावा घेतल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘न्यूज कट्टा’ चॅनेलने कोल्हापूर जिल्ह्यातील भटक्या प्राण्यांच्या समस्येवर बातमी लावून प्रशासनाला यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र, आता घडलेल्या घटनेने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गांधीनगर व्यापारपेठेतही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, ग्रामपंचायतीने आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने लक्ष घालून या भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.