वारणा नदीकाठच्या रहिवाशांसाठी सतर्कतेचा इशारा: धरणातून विसर्ग वाढवला जाणार!

वारणा (सलीम शेख) : आज सकाळी 11:45 वाजता: वारणा धरण व्यवस्थापनाने वारणा नदीकाठच्या रहिवाशांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत असल्याने, उद्या, दिनांक 7 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
सध्या वक्रद्वाराद्वारे 2870 क्युसेक विसर्ग सुरू आहे, तो वाढवून 8630 क्युसेक केला जाईल. याव्यतिरिक्त, विद्युतगृहातून सुरू असलेला 1630 क्युसेक विसर्ग कायम राहील. त्यामुळे, वारणा नदीपात्रात एकूण 10260 क्युसेक पाणी सोडले जाईल.
या वाढीव विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. धरण व्यवस्थापनाने कळवले आहे की, पाऊस चालू राहिल्यास किंवा वाढल्यास आणि धरणातील येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो.
नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात किंवा नदीकिनारी जाऊ नये, असे आवाहन वारणा धरण व्यवस्थापनाने केले आहे.