महाराष्ट्र ग्रामीण

चिपरी गावात एकावर हल्ला करून निर्घृण खून!

जयसिंगपूर (सलीम शेख ) : भरदिवसा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी सपासप वार करत २२ वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी (६ ऑगस्ट) चिपरी गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संदेश लक्ष्मण शेळके (रा. चिपरी) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. संदेश हा आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परत येत असताना, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आपला जीव वाचवण्यासाठी संदेश पळत असताना, हल्लेखोरांनी त्याला एका ऑइल मिलच्या गेटसमोर गाठले. तिथे धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. हल्लेखोरांनी विशेषतः त्याच्या मानेवर गंभीर वार केल्याने संदेशचा जागीच मृत्यू झाला.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चिपरी गावात संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, प्रत्यक्षदर्शींची चौकशीही सुरू आहे.
या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा इतर काही कारणांमुळे हा खून झाला असावा का, या दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिपरी आणि परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button