चिपरी येथील खून प्रकरणाचा ६ तासांत छडा; जयसिंगपूर पोलिसांची कामगिरी

चिपरी ता. शिरोळ (सलीम शेख ): येथील संदेश लक्ष्मण शेळके (२५) या तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत लावला असून, या प्रकरणी तीन आरोपींना चिक्कोडी (कर्नाटक) येथून अटक करण्यात आली आहे. खुनामागचे कारण समोर आले असून, मयताच्या बहिणीने आरोपीच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग हे या घटनेचे मुख्य कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता चिपरी गावातील घोडावत गेस्ट हाऊस आणि ऑईल मिलच्या रस्त्यावर संदेश शेळके याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी संदेशचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी चिक्कोडी येथे लपल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने तातडीने चिक्कोडीला धाव घेऊन सापळा रचला.
पोलिसांनी युवराज रावसाहेब माळी (३०, रा. चिपरी), सुरज बाबासो ढाले (३०, रा. खोची) आणि गणेश संभाजी माळी (२५, रा. चिपरी) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, मुख्य आरोपी युवराज माळी याने खुनाची कबुली दिली. संदेशच्या बहिणीने आपल्या आईबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचा राग मनात धरून त्याने संदेशचा कोयत्याने वार करून खून केल्याचे सांगितले.
हा संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, युनुस इनामदार, किशोर अंबुडकर, निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, रुपेश कोळी आणि जावेद पठाण यांनी यशस्वीरित्या पार पाडला. या जलद तपासामुळे जयसिंगपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.