कोल्हापूर: मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्क घरफोडीचा पर्दाफाश; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मेट्रो हायटेक को-ऑप टेक्सटाईल पार्क लि., कागल येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२० जुलै २०२५ रोजी पहाटे १ ते ४ च्या सुमारास कागल, हातकणंगले येथील मेट्रो हायटेक कंपनीच्या प्लॉट नं. ११०-१११ मधील पत्र्याचे शेड उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत शिलाई मशीनचे गड्डे आणि लोखंडी स्टॅंड असा एकूण ३ लाख ६८ हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला होता. कंपनीचे सेक्रेटरी आनंदा श्रीरंग माने (रा. इचलकरंजी) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिले होते. त्यानुसार, कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि इतर पोलीस अंमलदारांचे तपास पथक तयार केले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, संजय हुंबे आणि लखनसिंह पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीचा माल घेऊन आरोपी MH-11-AG-3070 क्रमांकाच्या ट्रकमधून कोल्हापूर-मुंबई रोडने मुंबईकडे जात आहेत.
या माहितीच्या आधारे तपास पथकाने कोल्हापूर ते पेठ नाका, कराडपर्यंत पाठलाग करत संशयित ट्रक हॉटेल #२६२७ जवळ अडवला. ट्रक चालक आणि केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, पोलिसांनी ट्रकमधील मालाची तपासणी केली. यामध्ये शिलाई मशीनचे गड्डे आणि स्टॅंड आढळून आले.
पोलिसांनी शफातुल्हा हबीबुल्ला खान (वय ५५, रा. कुर्ला ईस्ट, मुंबई) आणि विजय कुमार नारायण सिंग (वय ४०, रा. देवरिया, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी मेट्रो हायटेक कंपनीतून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १३ लाख ५ हजार रुपयांचे २९ जुकी शिलाई मशीनचे गड्डे (प्रत्येकी ४५,००० रुपये), ४५ हजार रुपयांचे ९ शिलाई मशीनचे लोखंडी स्टॅंड (प्रत्येकी ५,००० रुपये) आणि ५ लाख रुपये किमतीचा टाटा ४०७ ट्रक (क्रमांक MH-11-AG-3070) असा एकूण १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात वापरलेल्या ट्रकचा मालक अफजल नजीबुला खान (वय ३३, रा. जिहे, सातारा) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, संजय हुंबे, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, महेश खोत, सागर माने, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, हंबीरराव अतिग्रे, सुशील पाटील, सागर चौगले, संदेश कांबळे, संदीप गुरव, विनोद कुंभार, राजेंद्र ताटे, विनायक बाबर, सुरेश राठोड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.