हसूर खुर्द व बुद्रुक येथील लक्ष्मी मंदिराचे बांधकाम लवकरच पूर्ण करणार: मंत्री हसन मुश्रीफ

कागल (सलीम शेख ) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हसूर खुर्द आणि हसूर बुद्रुक येथील श्री लक्ष्मी मंदिराचे बांधकाम लवकरच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. या मंदिरामुळे पंचक्रोशीसह जिल्ह्याला एक चांगले तीर्थस्थळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हसूर खुर्द व हसूर बुद्रुक येथील श्री लक्ष्मी मंदिराच्या स्लॅबच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, कै. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माझी या मंदिराच्या बांधकामाची खूप इच्छा होती, पण दोन्ही गावांमध्ये एकमत होत नसल्याने हे काम थांबले होते. आता कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता हे मंदिर पूर्ण करायचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मंदिरासाठी संरक्षक भिंत, पेव्हिंग ब्लॉक, आणि मंदिरासमोर दीपमाळ उभारून मंदिराचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासनही दिले. तसेच, मंदिरासाठी देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला हसूर खुर्द व हसूर बुद्रुक येथील महिला आणि माहेरवाशिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माजी सरपंच व देवस्थान समिती अध्यक्ष अंकुश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अजयसिंह देसाई, हसूर खुर्दचे सरपंच सुभाष गडकरी, हसूर बुद्रुकचे सरपंच शितल लोहार यांच्यासह दोन्ही गावांचे ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.