हुपरी येथे अज्ञात तोयता पोलीसवर गुन्हा दाखल!

हूपरी (सलीम शेख) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे दोन तोतया पोलिसांनी एका ७० वर्षीय वृद्धाची ११ ग्रॅम सोन्याची चेन हातचलाखीने लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रामचंद्र गोपाळ यादव (वय ७०, रा. अंबाईनगर, हुपरी) हे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपेक्षा कॉर्नर येथे थांबले असताना त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यापैकी एकाने आपण पोलीस असल्याचे सांगितले. वरिष्ठांनी आपल्याला तपासणीसाठी पाठवल्याचे सांगून, त्यांनी यादव यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला खिशातले सामान रुमालात काढून ठेवण्यास सांगितले. त्या व्यक्तीने रुमालात सामान ठेवले आणि रुमाल बांधून तो परत दिला.
यानंतर, तोतया पोलिसांनी यादव यांनाही त्यांच्या खिशातील मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चेन काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. यादव यांनी सांगितल्याप्रमाणे रुमालात सर्व सामान ठेवले आणि रुमाल बांधला. याचवेळी हातचलाखीने त्यांनी यादव यांची अंदाजे ८५,००० रुपये किमतीची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून घेतली.
“इकडे तिकडे अजिबात दिसता कामा नये,” असे म्हणत ते दोघे दुचाकीवरून पसार झाले. घरी जाऊन यादव यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर त्यांना आपली सोन्याची चेन चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, संदेश शेटे आणि किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत.