हुपरीमध्ये अज्ञात चोरट्याने ३ लाख ८० हजारांचे दागिने लंपास!

हुपरी, ता. हातकणंगले (सलीम शेख ) : हुपरी येथील वाळवेकर नगर परिसरातून एका अज्ञात चोरट्याने सौ. आनंदी काशिबा मुदाळे यांच्या घरातून सुमारे ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना मागील सहा महिन्यांपूर्वी घडली असल्याचा अंदाज आहे, मात्र चोरीचा प्रकार काल, २ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. आनंदी मुदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात ठेवलेले सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये, १ लाख ६० हजार रुपये किमतीचा २ तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, १ लाख २० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे घंटण आणि त्यांच्या मुलीचा १ लाख रुपये किमतीचा सव्वा तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांमध्ये अष्टपैलु मणी असलेले जुवाकिंस होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला असावा, परंतु त्याची नक्की तारीख किंवा वेळ फिर्यादीला आठवत नाही. काल, २ ऑगस्ट रोजी चोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी हुपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेची नोंद पोलीस नाईक माने यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळपे करत आहेत. अद्याप कोणताही माल हस्तगत करण्यात आलेला नाही. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.