कोल्हापुरात हुपरी २.५४ लाखांचा गांजा जप्त; चार आरोपींना अटक!

हुपरी (सलीम शेख ) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर आणि हुपरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे २.५४ लाख रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना दि. २ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी ही कारवाई केली. यात एन. आर. चौखंडे, विकास शिंदे, प्रसाद कोळपे, अशोक चव्हाण, साताप्पा चव्हाण, संदेश शेटे, निखील मिसाळ, वेसनकर आणि धुळे या हुपरी पोलीस ठाण्यातील अंमलदारांचा समावेश होता.
यातील मुख्य आरोपी मोहिन मैनुद्दीन मुजावर (रा. संभाजीनगर, हुपरी, कोल्हापूर) याला सुरुवातीला १.६ किलो वजनाच्या, अंदाजे ४0,000 रुपये किमतीच्या गांजासह रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून एकूण १,९0,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहिनने हा गांजा यासीन खुदबुद्दीन मुल्ला (रा. संभाजीनगर, हुपरी, कोल्हापूर) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी निवृत्ती दादासो माळी , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर) यांनी हुपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
इतर आरोपींचा पर्दाफाश
तपासादरम्यान, अटक आरोपी मोहिन मैनुद्दीन मुजावरने बाळु अशोक बाडकर (वय ३५, रा. कनंगला, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) आणि रिहान अमिरआमजा गडमपल्ली (वय १९, रा. यादमुड, सध्या रा. कनंगला, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्याकडूनही गांजा घेतल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक चौखंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, तळंदगे (ता. हातकणंगले) येथील जगन्नाथ मंदिरामागे हे दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता, आरोपी बाळु बाडकर आणि रिहान गडमपल्ली यांच्याकडून १.७७१ किलो वजनाचा, अंदाजे ४४,२७५ रुपये किमतीचा गांजा आणि दोन मोबाईल हँडसेटसह एकूण ६४,२७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनाही तात्काळ अटक करण्यात आली आहे.
एकूणच या कारवाईत २,५४२७५ रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व अटक आरोपींना दि. २ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.