इचलकरंजीच्या ‘कुचनुर गॅंग’ला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

इचलकरंजी (सलीम शेख) : इचलकरंजी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ‘कुचनुर गॅंग’ या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. टोळीचा प्रमुख आणि त्याच्या साथीदाराला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, इचलकरंजी आणि हातकणंगले परिसरात गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण करणाऱ्या ‘कुचनुर गॅंग’च्या विरोधात इचलकरंजी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता.रियाज इमाम कुचनुर (वय ४५, रा. इचलकरंजी) – टोळीचा प्रमुख.,बजरंग रामचंद्र चौधरी (वय ५४, रा. इचलकरंजी) – सक्रिय साथीदार.
या दोन्ही आरोपींनी अनेक गंभीर गुन्हे केले असून, त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होत होता. हद्दपारी प्राधिकरणाने प्रस्तावाची चौकशी करून आरोपांची पुष्टी केली. त्यानंतर ७ जुलै २०२५ रोजी दोघांनाही कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी केली असून, आरोपींना जिल्ह्याबाहेर काढण्यात आले आहे. हद्दपार केलेले आरोपी जिल्ह्यात कुठेही आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्ष (०२३१-२६६२३३३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.