इचलकरंजी महापालिकेतील 18 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

इचलकरंजी (सलीम शेख ) : इचलकरंजी महानगरपालिकेची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिक विश्वजित जयकुमार पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद अमृत कांबळे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सन २०२० ते २०२३ या कालावधीत महापालिकेच्या पाच शाळांच्या दुरुस्ती आणि मैदान विकसित करण्याचे काम न करताच, बनावट कागदपत्रे तयार करून शैलेश पोवार या ठेकेदाराच्या नावाने १८ लाख ५ हजार ५४६ रुपयांची दोन बिले काढण्यात आली होती. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये ठेकेदार पोवार याच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने त्याचा थेट सहभाग दिसून आला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोवारला अटक करण्यात आली होती.
आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने या प्रकरणाचा तपास करताना, या फसवणुकीमध्ये महापालिकेतील लिपिक विश्वजित पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद कांबळे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या दोघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्या अर्जावर ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.