कळंबा कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा: कैद्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

कोल्हापूर (सलीम शेख) : प्रेम, विश्वास आणि बंधनाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला यंदा एक वेगळीच झळाळी मिळाली, ती कळंबा मध्यवर्ती कारागृहात. धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात कैद्यांना बहिणीच्या प्रेमाचा स्पर्श अनुभवायला मिळाला.
संस्थेच्या महिलांनी कारागृहातील बंदीजन आणि पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याशी भावनिक नातं जोडलं. अनेक वर्षांनी बहिणीच्या मायेचा अनुभव घेतल्याने अनेक कैदी भावुक झाले. काहींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, तर काहींनी राखी जपून ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात कारागृह अधीक्षक विवेक झेंडे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, भागीरथी संस्थेच्या संचालिका शिवानी पाटील, अभिजीत यादव, सुलोचना नार्वेकर, ऐश्वर्या देसाई, सीमा पालकर, स्नेहल खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाने रक्षाबंधनाचा खरा अर्थ प्रेम, आपुलकी आणि विश्वास अधोरेखित केला. बंदिस्त भिंतींमध्येही माणुसकीचा सुगंध दरवळतो, हे या कार्यक्रमाने सिद्ध केले.