मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी करनूर गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले!

कागल (सलीम शेख ) : करनूर गावातील मिरासो शेख क्रांती सेना प्रमुख आणि शिक्षण बचाव समितीचे अध्यक्ष यांनी करनूर गावातील प्रलंबित प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्याशी चर्चा केली. ही बैठक ७ तारखेला कोल्हापूर कार्यालयात पार पडली.
या बैठकीत एकूण नऊ विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये उर्दू विद्यामंदिर करनूर शाळेतील दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती शिक्षण विभागाकडून टाळली जात असल्याचा मुद्दा प्रमुख होता. यावर, शिक्षण विभागाच्या दिरंगाईबाबत शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याशिवाय, २०१९ च्या पुनर्वसनाबाबत तत्कालीन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या निर्देशानंतरही महसूल विभागाकडून १२१ कुटुंबांचे पुनर्वसन टाळले जात असल्याचा प्रश्नही चर्चेत होता. यावरही शेख यांनी सविस्तर माहिती दिली.
मिरासो शेख यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी लवकरच करनूर गावाला भेट देऊन या सर्व प्रश्नांची पाहणी करण्याचे आणि ते मार्गी लावण्याचे आश्वासन शेख यांना दिले.