कागलचा उड्डाणपूल: घोषणा झाली, प्रत्यक्ष काम कागदावरच! सहापदरी मार्गासाठी ६०० कोटींचा प्रकल्प मंजूर, पण प्रारंभाची अनिश्चितता कायम!

कागल (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरणामध्ये कागल शहरात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रतीक्षा नागरिकांना आणि प्रवाशांना लागून राहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाची चर्चा सुरू असली आणि तो मंजूर झाल्याचे जाहीर झाले असले तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
महामार्गाच्या चौपदरी रुंदीकरणावेळी राहिलेल्या अनेक त्रुटी आजही कायम असल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता सहापदरी रस्ता रुंदीकरणाचे काम मंजूर झाल्यामुळे, या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी दक्ष राहण्याची गरज व्यक्त होत असून, यासाठी कृती समितीही स्थापन करण्यात आली आहे.
सध्या एसटी डेपोपासून कर्नाटक हद्दीपर्यंत, म्हणजेच दूधगंगा नदीपर्यंत रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. कागल शहरातील रुंदीकरणाचे काम तर जवळजवळ थांबल्यासारखी स्थिती आहे. कर्नाटकातील कोगनोळी येथील उड्डाणपूल सर्कलचे काम युद्धपातळीवर सुरू असताना, कागलमधील रुंदीकरणाच्या कामाला मात्र गती आलेली नाही. ज्या ठिकाणी उड्डाणपूल होणार आहे, तिथे सध्या फक्त बाजूच्या गटारीचे बांधकाम सुरू असून, इतर सर्व कामे थांबलेली आहेत.
सहापदरी रुंदीकरणाच्या वेळी कागल येथील शाहू साखर कारखाना माळ बंगला ते कागल चेक पोस्टपर्यंत दोन किलोमीटरचा २४७० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
या उड्डाणपुलाचा मुख्य भाग १९७५ मीटर लांबीचा असून, तो अंदाजे ५५ मीटर अंतरावर असलेल्या सुमारे ४० पिलरवर उभारला जाईल. त्याची रुंदी २५ मीटर असणार आहे. कोल्हापूरच्या दिशेने २७५ मीटर आणि निपाणीच्या दिशेने २२० मीटरचा शेवटचा उतार असेल. या महामार्गामुळे कागल शहराचे पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग झाले आहेत. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे, पण सध्या तरी हा प्रकल्प केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.