कागलच्या बस्तवडे पुलाच्या अपुऱ्या कामांसाठी शिवसेनेचं आंदोलन; ग्रामस्थांकडून तीव्र संताप

शेंडूर/बस्तवडे (सलीम शेख ) : कागल तालुक्यातील बस्तवडे येथील नदीवर चार वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल अनेक अपुऱ्या कामांमुळे ग्रामस्थ आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या अपुऱ्या कामांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. पुलावर गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या चालकांची दिशाभूल होत आहे.
बस्तवडे ग्रामस्थांना भुयारी मार्ग करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. हा भुयारी मार्ग शक्य असूनही तो न बनवल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पुलावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत.
अपुऱ्या कामांमुळे बस्तवडे पुलाजवळ अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
या संदर्भात प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असून, हा प्रश्न वृत्तपत्रांमधूनही वारंवार मांडण्यात आला आहे, तरीही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपुरी कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंदोलनात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बस्तवडे येथील पुलाच्या अपुऱ्या कामांबाबत लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, उपतालुकाप्रमुख समिर देसाई, उपतालुकाप्रमुख युवराज येजरे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख नितीन डावरे, माजी तालुकाप्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख नितीन भोकरे, विभाग प्रमुख राजू साबळे, विभाग प्रमुख अमृत पाटणकर, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील, विभाग प्रमुख संदीप कांबळे, युवा सेना शहर प्रमुख विजय भोई, शंकर गंधुगडे, वैभव कांबळे, अमित पाटील, कापशी शहर प्रमुख चंदू सांगले, रामदास पाटील, शेतकरी संघटना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले, माजी सरपंच पांडू वांगळे, पिंटू पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जे. एल. पाटील, विघ्नेश खटांगळे, अमित भोई, अजित बोडके, प्रमोद अश्रू पाटील, रणजीत हातकर, किरण मासुळे, लक्ष्मण माळी, नेताजी वायदंडे, ब्लॅक पॅंथर संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील (देवदूत), व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढणार का आणि बस्तवडे पुलाची अपुरी कामे मार्गी लागणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.