कागलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी!

कागल (सलीम शेख) : कागल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विज्ञानवादी विचारांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी केली.
हा जयंती सोहळा बापूसो महाराज चौकातही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सात्विक चितारे या चिमुकल्या विद्यार्थ्याने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रभावी भाषण दिले. त्याच्या भाषणाने उपस्थितांना अण्णाभाऊंच्या कार्याची आणि विचारांची ओळख झाली. सात्विकच्या या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले.यावेळी गरजूंना मंत्री हसन मुश्रीफ व बच्चन कांबळे यांच्या हस्ते प्रापचींत साहित्य धान्य किट वाटण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे महान साहित्यिक होते. त्यांनी ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे’ असे विज्ञानवादी विचार मांडले. तसेच, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून तो रशियातही सादर केला.
या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रकाश गाडेकर, भैय्या माने, बच्चन कांबळे, सुमित पाटील, प्रविण काळभोर, संजय चितारे, अमोल सोनुले, प्रकाश सोनुले, राहुल कारंडे आणि सुरज कामत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.