शिवाजी विद्यापीठ ते माऊली चौक रस्ता खड्डेमय; “सिमेंट-डांबर” प्रयोगावर प्रश्नचिन्ह!

राजारामपुरी (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठापासून माऊली चौकापर्यंत, विशेषतः राजारामपुरी पोलीस ठाण्याजवळचा रस्ता सध्या वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याची विचित्र बांधणी पद्धत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
वास्तविक पाहता, हा रस्ता कॉंक्रिटीकरणाने करण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी या रस्त्यामध्ये आणि त्याच्या बाजू पट्टीत डांबराचा वापर केल्याने समस्या निर्माण झाली आहे. डांबराचे हे भाग खडीसकट उखडले असून, त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. डांबर, खडी आणि सिमेंट काँक्रिटचा वापर करून रस्ता तयार करण्याचा हा “नवीन प्रयोग” संबंधित ठेकेदाराने केला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीही या रस्त्याच्या बांधणी पद्धतीवरून चर्चा सुरू होती. “डांबर, खडी आणि सिमेंट काँक्रिटचा रोड हा जगातला पहिला प्रयोग असावा,” अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. या विचित्र प्रयोगामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून, वाहनचालकांना खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, स्थानिक नागरिकांनाही धुळीचा आणि अपघातांचा धोका वाढला आहे.
या गंभीर समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.