कोल्हापूरला खंडपीठ मंजूर; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली माजी खासदार संभाजी राजे आनंदाची बातमी!

कोल्हापूर: कोल्हापूर आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर कोल्हापूर खंडपीठाला (सर्किट बेंच) केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. स्वतः भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ही माहिती माजी खासदार संभाजी राजे विमानातून प्रवास करत असताना दिली, ती नंतर सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर करण्यात आली.
दिल्लीहून नागपूरला विमानाने प्रवास करत असताना सरन्यायाधीश गवई आणि माजी खासदारांचे आसन शेजारी होते. या अनपेक्षित भेटीदरम्यान, सरन्यायाधीशांनी माजी खासदारांना ही आनंदाची बातमी दिली. “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ (सर्किट बेंच) आजच नोटिफाय झाले आहे,” असे ते म्हणाले. ही बातमी ऐकून माजी खासदार काही क्षण स्तब्ध झाले.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना माजी खासदारांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधव खंडपीठासाठी सातत्याने संघर्ष करत होते. माझ्या खासदारकीच्या काळातही केंद्रीय स्तरावर यासंदर्भात पाठपुरावा केला होता आणि अखेर या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान मला मिळाले.” खुद्द सरन्यायाधीशांकडून ही आनंदाची बातमी मिळाल्याने त्यांना विशेष आनंद झाल्याचे त्यांनी व्यक्त केले.
या निर्णयाबद्दल त्यांनी खंडपीठासाठी लढा दिलेल्या सर्व वकील बांधवांचे आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना न्याय मिळवण्यासाठी आता मुंबईपर्यंत जावे लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.