बोगस कामगार प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्तांना निलंबित करा; शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : बोगस कामगारांच्या घोटाळ्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांना तातडीने निलंबित करून शासनामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. याप्रकरणी संजय पवार (उपनेते) आणि विजय देवणे (सहसंपर्कप्रमुख) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. यामध्ये कामगार आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, जिल्हा परिषद, आरटीओ आणि महसूल खाते यांचा समावेश आहे. या विभागांमधील अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. हा सर्व पैसा करदात्यांचा असून, त्याचा उपयोग विकास कामांसाठी होण्याऐवजी अनेक वर्षांपासून त्याची खुलेआम लूट होत आहे. या भ्रष्टाचाराला विद्यमान सरकार जबाबदार असून, बदल्यांसाठी ठरलेले ‘रेट कार्ड’ हे यामागे मुख्य कारण आहे, ज्यामुळे अधिकारी पैसे वसूल करण्याच्या मागे लागले आहेत.
सध्या चर्चेत असलेले बोगस कामगारांचे प्रकरण हे त्यातीलच एक गंभीर बाब आहे. या कार्यालयातील खऱ्या आणि गरजू कामगारांना त्यांचा हक्क मिळणे आवश्यक आहे. पक्षाने अनेकवेळा सहाय्यक कामगार आयुक्तांकडे बोगस कामगारांविषयी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले, हे या घोटाळ्यावरून स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असे घोटाळे होऊ शकत नाहीत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधीही सरकारी तिजोरीवर डल्ला मारून कार्यकर्ते पोसण्याचे पाप करत असल्याचा दावाही शिवसेनेने केला आहे. केवळ बोगस कामगारांवर फौजदारी दाखल न करता, ज्यांनी पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्रे दिली आहेत अशांची आणि दलालांची मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संजय पवार आणि विजय देवणे यांनी केली आहे.